जळगाव- तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी शाळा उघडल्या. भविष्याचा वेध घेऊ शकणारी हजारो पावले शाळांच्या परिसरात पडली. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या आहेत. जळगाव जिल्ह्यासह शहरातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिक्षकांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन स्वागत केले.
स्कूल चले हम... जळगावातील शाळा गजबजल्या; ठिकठिकाणी प्रवेशोत्सव साजरा उन्हाळी सुटी संपल्यानंतर सोमवारपासून 2019-20 या नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. जळगाव जिल्ह्यासह शहरात शेकडोंच्या संख्येने असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, म्हणून अनेक शाळांनी खास उपक्रम राबवले होते.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत 'डोरेमॉन','छोटा भीम', 'स्पायडरमॅन', 'नाईट रायडर', यासारख्या कार्टून्स मित्रांची वेशभूषा असलेल्या पात्रांकडून करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट, खेळणीदेखील देण्यात आली. काही शाळांमध्ये तर आकर्षक सजावट, रंगरंगोटी करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लक्षवेधी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शाळेचे प्रवेशद्वार, वर्गखोलीजवळ शिक्षक हात जोडून विद्यार्थ्यांचे स्वागत करत होते. या साऱ्या उत्साहपूर्ण वातावरणाने चिमुकले भारावले होते.
पालकांची उडाली धावपळ -
नर्सरी, ज्युनिअर केजीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाचे वातावरण काहीसे निराळे असल्याने त्यांची रडारड पाहायला मिळाली. नवखे चेहरे, आई-वडिलांऐवजी भलतेच कोणीतरी जवळ असल्याने त्यांची रडारड थांबत नव्हती. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाल्याला शाळेत सोडण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ उडाली. रिक्षा तसेच बसवाल्या काकांचीदेखील पळापळ होत होती. विद्यार्थ्यांना वेळेत त्यांच्या शाळेत पोहोचवल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.