जळगाव- जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांना फटका बसणार आहे. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्याचे देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जळगावात अवकाळी पाऊस; रब्बीच्या पिकांना फटका हेही वाचा -विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांचा पाहणी दौरा; साफसफाई करता कर्मचाऱ्यांची पळापळ
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी अमळनेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस तसेच गारपीट झाली होती. त्यानंतर जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून पाऊस सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार तसेच बाजारातील किरकोळ विक्रेत्यांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागला.
अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्यावर शेतकऱ्यांना रब्बी हंगामावर खूप अपेक्षा होती. मात्र, रब्बीच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. फळबागांसोबतच बागायती कापसाला देखील अवकाळीचा फटका बसला आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत असून दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल असल्याचे चित्र आहे.