जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम असून, गुरुवारी (29 एप्रिल) देखील दिवसभरात 1 हजार 63 नवे बाधित रुग्ण समोर आले. चिंतेची बाब म्हणजे, 21 रुग्णांचा देखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 163 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता कायम आहे.
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात 1हजार 63 नवे रुग्ण आढळले, तर 1103 रुग्ण कोरोनातून बरे झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजार 129 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 10 हजार 705 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात 3 हजार 33 रुग्णांना लक्षणे आहेत. 7 हजार 672 रुग्णांना लक्षणे नाहीत. यातील 6 हजार 743 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 1 हजार 592 रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर तर 845 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
अमळनेर तालुक्यात संसर्ग वाढला-
गुरुवारी समोर आलेल्या तपासणी अहवालात सर्वाधिक 205 रुग्ण हे अमळनेर तालुक्यात आढळले आहेत. त्या खालोखाल 167 रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत. जामनेर तालुक्यात देखील 126 रुग्ण नव्याने समोर आले. गुरुवारी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये सर्वाधिक 717 तर आरटीपीसीआर टेस्टमधून 346 रुग्ण समोर आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने समोर येणारे रुग्ण आणि कोरोनातून बरे होणारे रुग्ण यांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा 89.37 इतका झाला आहे.