मुंबई :राज्याच्या अंतर्गत भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील चार तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांत पाऊस पडेल अशी माहिती मुंबई (कुलाबा) वेधशाळेचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.
'विजेच्या गडगडाटासह पाऊस' ही स्थिती राज्याच्या अंतर्गत भागात सक्रिय झाली आहे. वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असणार आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यात पुढील चार तासांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता.. आज राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने पावसाच्या वेगाला गती मिळाली आहे. तो दक्षिण कोकणातून राज्यात दाखल झाला. येत्या ४८ तासात मान्सून पुढे सरकेल, अशी माहिती होसाळीकर यांनी आज सकाळी दिली होती. मान्सूनचा प्रवास उत्तरेकडे होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही सांगण्यात आले होते.
पुढील हवामानाचा अंदाज :
- १२ जून : कोंकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
- १३ जून : कोंकण-गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक तर, मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
- १४ जून : कोंकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
- 15 जून : कोंकण-गोवा भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
हेही वाचा :आत्ता पडणाऱ्या पावासावर अवलंबून राहून पेरण्या करू नयेत; शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञांचा सल्ला