महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात तीन वर्षाच्या बालिकेचा कोरोनामुळे मृत्यू? वैद्यकीय अहवाल बाकी - जळगाव कोरोना न्यूज

तीन वर्षाच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. श्वसनसंस्थेतील गुंतागुंतीच्या आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याने हा कोरोनाचा तर बळी नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Jalgaon Corona Update
जळगाव कोरोना अपडेट

By

Published : Apr 7, 2020, 8:37 AM IST

जळगाव - शहरातील एका तीन वर्षाच्या बालिकेचा सोमवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. श्वसनसंस्थेतील गुंतागुंतीच्या आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याने हा कोरोनाचा तर बळी नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे, म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने तिच्या मृतदेहाचे नमुने घेतले असून ते कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बालिकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

मृत तीन वर्षाच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा श्वसनसंस्थेतील गुंतागुंतीमुळे झाल्याने खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी खबरदारी म्हणून ही बाब पोलिसांसह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाला कळवली.

हेही वाचा -'कोविड-१९' ओळखण्यासाठी 'मोबाईल अ‌ॅप'..

त्यानंतर बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे म्हणून मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. त्या ठिकाणी मृतदेहाचे नमुने घेऊन ते कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत तिच्या कुटुंबीयांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये श्वसनसंस्थेतील गुंतागुंत हे प्रमुख लक्षण आढळून येते. शिवाय बालिकेचा मृत्यू हा लगेचच झाल्याने त्याविषयी संशय वाढला आहे.

बालिकेवर तत्काळ करण्यात आले अंत्यसंस्कार-

दरम्यान, बालिकेचा मृत्यू संशयास्पद असल्याने तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले नाही. तिच्यावर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत तत्काळ अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार होतात, तशाच पद्धतीने या बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणादेखील धास्तावली आहे. बालिकेच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर मात्र, जळगावात कोरोनाच्या बळींची संख्या दोनवर पोहचणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details