जळगाव - दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांना गिरणा नदीत जलसमाधी मिळाली. या दुर्दैवी घटना बुधवारी भडगाव तालुक्यातील पिंपळगाव आणि गिरड याठिकाणी घडल्या. पिंपळगाव येथे एक 22 वर्षीय तरुण मित्रांसोबत नदीत पोहताना बुडाला, तर कासोदा येथील दोघे दुचाकीस्वार गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. गिरड येथे गिरणा नदीवर असलेल्या पुलावर ही घटना घडली. या दोन्ही घटनेतील दोघांची आज (गुरुवारी) सकाळी ओळख पटली. ]
भूषण अशोक पाटील (वय 22, रा. पिंपळगाव, ता. भडगाव), अयाजोद्दिन शफियोद्दिन (वय 32) शेख गफूर शेख गुलाब (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. अयाजोद्दीन व शेख गफूर हे कासोदा येथील रहिवासी आहेत.
पिंपळगाव येथील भूषण पाटील हा तरुण त्याच्या तीन ते चार मित्रांसोबत गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेला होता. पिंपळगाव गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ हे सर्व जण पोहत होते. पिंपळगाव येथे गिरणा नदीचे पात्र प्रचंड रुंद आहे. गिरणा धरणातून सोडलेले पाणी तसेच भडगाव परिसरात दोन दिवसांपासून पावसाने लावलेली जोरदार हजेरी, यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. सर्व मित्र नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत असताना भूषण अचानक पाण्यात बुडाला. तो पाण्यातून बाहेर आलाच नाही. ही बाब त्याच्या सोबत असलेल्या इतरांच्या लक्षात आल्यानंतर भूषणची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी थेट गिरडपर्यंत दोन्ही काठावर, तर पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी नदीपात्रात शोध घेतला. परंतु, रात्री उशिरापर्यंत भूषणचा शोध लागला नाही.
गिरड जवळ दुचाकीसह दोघे वाहून गेले-
कासोदा येथील ख्यॉजाबाबा दर्गा परिसरातील तरुण अयाजोद्दिन शफियोद्दिन हा चादरी विक्रीसाठी पाचोरा येथे गेला होता. सायंकाळी तो दुचाकीवरून घराकडे परत येत होता. त्याच्यासोबत शेख गफूर शेख गुलाब हे देखील होते. गिरड गावाजवळ गिरणा नदीवरील पुलावरून जात असताना ते दुचाकीसह पुरात वाहून गेले. पुलावरून तीन फूट पाणी वाहत असतानाही अयाजोद्दीन याने पुलावर दुचाकी पुढे नेली. वाहून गेल्यानंतर त्याचा मृतदेह उत्राणजवळ दोन किलोमीटर अंतरावर आढळला. अयाजोद्दिनचा चुलत भाऊ निजामुद्दिन याने त्याची ओळख पटवली. दुचाकी पुलावरून वाहून गेल्याची घटना गावकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितली. पण पुरामुळे त्यांना वाचवू शकले नाहीत.