जळगाव - शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात 35 वर्षीय पोलिसासह, त्याची 30 वर्षीय पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. यामुळे जळगाव पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहर वाहतूक शाखेतील पोलिसाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण; तिघे पॉझिटिव्ह - जळगाव कोरोना अपडेट
कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे पोलीस कुटुंब पोलीस मुख्यालयाशेजारी असलेल्या दक्षतानगरातील रहिवासी आहे. यापूर्वी याच दक्षतानगरात वास्तव्यास असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा याठिकाणी तिघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे पोलीस कुटुंब पोलीस मुख्यालयाशेजारी असलेल्या दक्षतानगरातील रहिवासी आहे. यापूर्वी याच दक्षतानगरात वास्तव्यास असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा याठिकाणी तिघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आधीच्या कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने तिघांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दक्षतानगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेल्या पोलिसाच्या कुटुंबातील तिघांचा समावेश होता. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते मंगळवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या वृत्तास जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. एन. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेला पोलीस कर्मचारी हा शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. त्याच्या पत्नीसह मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने दक्षतानगरासह शहर वाहतूक शाखा आणि पोलीस दलातील इतरांच्या अडचणी वाढल्या आहेत. शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे, पोलीस कर्मचारी राहत असलेल्या दक्षतानगरातील इतर कुटुंबांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार असून आवश्यक असलेल्या लोकांना तत्काळ क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि मालेगाव बंदोबस्तावर असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर -
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 475 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहरासह रावेर आणि अमळनेर येथील संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही 55 इतकी झाली आहे.