महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यासह तिघे निलंबित - जळगाव कोरोना अपडेट

भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे. 82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 7 मधील शौचालयात मृतदेह आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता.

जळगाव कोरोना अपडेट
जळगाव कोरोना अपडेट

By

Published : Jun 12, 2020, 9:40 AM IST

जळगाव - भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, तिघांवर प्रशासकीय कामकाजात अक्षम्य कुचराई केल्याचा ठपका ठेवला आहे.

82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 7 मधील शौचालयात मृतदेह आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग, मृत्यूदर कमी होत नसताना, हे गंभीर प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई अस्त्र उगारले आहे.

या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी असलेले अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह वैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, निवासी डॉक्टर कल्पना धनकवार यांना निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सरकारकडे दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली होती.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने जळगावातील कोविड रुग्णालयातील प्रकरणाबाबत केलेल्या कारवाईनंतर 'आयएमए' आक्रमक झाली आहे. ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप 'आयएमए' कडून केला जात आहे. कोरोनाग्रस्त वृद्धा बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाची देखील जबाबदारी असताना फक्त डॉक्टरांवर कारवाई करणे योग्य नाही. रुग्णालय प्रशासन मोठ्या अधिकाऱयांना वाचविण्यासाठी डॉक्टरांचा बळी घेत आहे, अशी टीका 'आयएमए'चे राज्य कोषाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details