भुसावळ (जळगाव) -प्रवासात रेल्वे प्रवाशाचे लक्ष नसताना तसेच दरवाजाजवळ उभे असताना काठीने हातावर मारत मोबाईल लांबवण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त केले. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला.
दरम्यान, रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोऱ्या पाहता लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 11058 अप पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळ ते जळगाव प्रवास करत असलेल्या निलेश जगन्नाथ वाणी (रा. संतोषी डेअरीजवळ, जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देवीदास तायडे (रा. शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत 58 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.
अहमदाबाद-यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक चारमधील बर्थ क्रमांक 56 वरून नंदुरबार ते जळगाव प्रवासी करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (रा. आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. 14 सप्टेंबरला ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्वर ईडी (वय 47 वर्षे, रा. खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, ता. शिरपूर, जि.धुळे) या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ यांनी केली.