महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचे नियम धाब्यावर.. कडक निर्बंधातही आव्हाणे येथे हजारोंच्या संख्येत बारागाड्या उत्सव - जळगाव कोरोना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात मृत्यूचे अक्षरशः तांडव सुरू आहे. मात्र, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून, कडक निर्बंधातही तालुक्यातील आव्हाणे येथे गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मरिमाता यात्रोत्सवाच्या निमित्ताने बारागाड्या उत्सव साजरा करण्यात आला.

Baragadaya festivals in jalgaon
Baragadaya festivals in jalgaon

By

Published : May 7, 2021, 12:45 AM IST

Updated : May 7, 2021, 12:55 AM IST

जळगाव -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात मृत्यूचे अक्षरशः तांडव सुरू आहे. मात्र, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून, कडक निर्बंधातही तालुक्यातील आव्हाणे येथे गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मरिमाता यात्रोत्सवाच्या निमित्ताने बारागाड्या उत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या उत्सवादरम्यान पोलिसांच्या बंदोबस्त होता. तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत हा उत्सव साजरा करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आव्हाणे येथे हजारोंच्या संख्येत बारागाड्या उत्सव

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे दरवर्षी मरिमाता यात्रोत्सवाचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. यावर्षी देखील कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्यामुळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेल्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी पार पडला. प्रतिकात्मक स्वरूप म्हणून बारागाड्या ऐवजी एकच गाडे ओढण्यात आले असले तरी या कार्यक्रमादरम्यान हजारो भाविकांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी असताना आव्हाणे येथे झालेल्या या कार्यक्रमाला नेमका कुणाचा आशीर्वाद होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका उत्सवादरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक जमा होत असताना जिल्हा व पोलीस प्रशासनाची यंत्रणा काय करत होती? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत हजारोंचा जमाव जमलाच कसा?

आव्हाणे गावाचा यात्रोत्सव असताना जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सकाळपासून गावातच होते. त्यामुळे गावाच्या मुख्य बाजारपेठ भागात दुपारी तीन वाजेपर्यंत गर्दी झालेली नव्हती. मात्र, दुपारी चार वाजेनंतर गावातील बस स्थानक परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. त्यानंतर गावात बंदोबस्तासाठी अनेक पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले होते. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील गावाचा बारागाड्या उत्सवादरम्यान हजारो नागरिक जमा झाले. पण पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्रामपंचायत प्रशासन असो वा ग्राम दक्षता समिती, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे, या उत्सवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता सध्या गाजत आहे.

पहिल्या लाटेत आव्हाणे होते कोरोनाचे हॉटस्पॉट!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जळगाव तालुक्यातील आव्हाणे हे गाव हॉटस्पॉट ठरले होते. या गावात आतापर्यंत दोनशेपेक्षा आधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, १४ रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत देखील ग्रामपंचायत प्रशासनाने हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी दिली, यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जळगाव शहरापासून हे गाव केवळ ७ किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम होत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Last Updated : May 7, 2021, 12:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details