जळगाव - शहरातील तांबापुरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय प्रौढाचा २४ मे रोजी काेविड रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान, मृत्यूपूर्वी या प्रौढाचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रौढाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्यानंतर सुमारे एक हजार लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे आता शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
हजारावर लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झालेल्या जळगावातील मृत प्रौढाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह..! - अंत्यसंस्कारानंतर कोरोना पॉझिटिव्ह
रुग्णालय प्रशासनाने या प्रौढाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्यानंतर सुमारे एक हजार लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे आता शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
दहा ते बारा दिवसांपासून प्रकृती खराब असलेल्या या प्रौढास २४ मे राेजी अत्यवस्थ वाटत होते. त्यामुळे सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांना लागलीच कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले होते. सुमारे तासभर उपचार केल्यानंतर या प्रौढाचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाचा संसर्ग असल्याच्या शक्यतेवरून स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत प्रौढ व्यक्ती ही तांबापुरातील एका धार्मिक स्थळाचे ट्रस्टी म्हणून काम पाहत होती. रमजान महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकींना हजेरी लावली होती. त्यांचा समाजात जास्त वावर होता. असे असतानाही रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता सुमारे एक हजार लोकांच्या उपस्थितीत तांबापुरापासून अंत्ययात्रा निघाली. गर्दीतच त्यांच्यावर अत्यंसंस्कार झाले.
या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुमारे ३० कर्मचारी देखील तेथे हजर होते. त्यामुळे आता काेरोना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रौढाचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्यामुळे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमळनेर आणि भडगाव शहरातही अशाच प्रकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. तरीही प्रशासन गांभीर्याने कृती करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने शतकी टप्पा ओलांडला असून आता ती दीडशतकाच्या उंबरठ्यावर आहे. आता पुन्हा शहरावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.