महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला; 60 वर्षीय महिलेला लागण, अहवाल पॉझिटिव्ह - जळगाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग

जळगाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल असलेल्या एका 60 वर्षीय महिलेची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

Third patient found corona positive in Jalgaon
जळगावात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला

By

Published : Apr 18, 2020, 11:52 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल असलेल्या एका 60 वर्षीय महिलेची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल आज रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

अमळनेर येथील एका 60 वर्षीय महिलेला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला 17 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले होते. तिच्या घशाचे स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल आज रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे.

या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. तिची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढली जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच महिलेला कोरोनाची लागण कशी झाली, याचे उत्तर मिळणार आहे, असे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी जळगाव शहरातील मेहरूण भागातील एका 49 वर्षीय प्रौढासह सालारनगरातील 63 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मेहरूण येथील प्रौढाचा उपचारादरम्यान कोरोना चाचणीचे 2 अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर सालारनगरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details