जळगाव -शहरातील गोलाणी मार्केटमध्ये असलेले एक खासगी फायनान्सचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी लॉक डाऊनचा फायदा घेत फोडले आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उजेडात आली. चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचा तोडून तेथील संगणक व इतर साहित्य चोरून नेले आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत जळगावात फोडले फायनान्स कार्यालय - जळगाव चोरी
लॉकडाऊनचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याने गोलाणी मार्केटमधील इतर व्यावसायिक देखील धास्तावले आहेत. या मार्केटमध्ये मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील दुकानांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गोलाणी मार्केटमध्ये एफ विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर वैष्णवी असोसिएट्स नावाने एक खासगी फायनान्सचे कार्यालय आहे. गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, नजरगहाण कर्ज, तारण कर्ज तसेच विविध बँकांकडून कर्जपुरवठा करण्याबाबतचे काम याठिकाणी चालते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हे कार्यालय बंद होते. या कार्यालयाशेजारी असलेली इतर दुकाने आणि कार्यालये देखील बंद आहेत. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वैष्णवी असोसिएट्स या कार्यालयात चोरी केली आहे. चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचा तोडून आत प्रवेश केला. आतून संगणक तसेच इतर साहित्य चोरून नेले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. गुरुवारी दुपारी ही घटना समोर आली. कार्यालयातून नेमके किती रुपयांचे साहित्य चोरीस गेले? हे मात्र, स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी कार्यालयात पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लॉकडाऊनचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याने गोलाणी मार्केटमधील इतर व्यावसायिक देखील धास्तावले आहेत. या मार्केटमध्ये मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील दुकानांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.