महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाख रुपये लुटणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; उल्हासनगरातून केली अटक

पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची बॅग चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. घटनेवेळी आरोपींची दुचाकी आणि पिस्तूलची मॅगझीन घटनास्थळी पडली होती. दुचाकीच्या चेसिस नंबरवरून चोरट्यांची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करत उल्हासनगरातून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Jalgaon Latest Crime News
जळगाव लेटेस्ट क्राईम न्यूज

By

Published : Mar 5, 2021, 7:37 PM IST

जळगाव -पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची बॅग चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या दोघांच्या उल्हासनगरातून मुसक्या आवळल्या. दोघांच्या ताब्यातून 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मनोज मोकळ आणि राजेंद्र राजपूत अशी दोन्ही चोरट्यांची नावे असून ते धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी आहेत.

जळगाव : पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाखांची चोरी
जळगाव : पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाखांची चोरी
या गुन्ह्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही गुन्हेगारांच्या अटकेबाबत सविस्तर माहिती दिली.काय आहे प्रकरण?

जळगाव शहरातील एमआयडीसीतील प्रभा पॉलिमर कंपनीचे कर्मचारी महेश भावसार व संजय विभांडीक हे 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता 15 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन गणपतीनगरकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी भावसार यांच्याकडे रोकड असलेली बॅग होती. तर विभांडीक हे दुसऱ्या दुचाकीवर होते. पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आल्यानंतर संशयित आरोपी मनोज व राजेंद्र हे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांच्या मागून आले. त्यांनी भावसार व विभांडीक यांच्या दुचाकी अडवत पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. झटापटीत पिस्तूल रोखून पैशांची बॅग चोरून पळ काढला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चोरट्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली होती.

असा लागला छडा

या घटनेवेळी आरोपींची दुचाकी आणि पिस्तूलची मॅगझीन घटनास्थळी पडली होती. दुचाकीच्या चेसिस नंबरवरून चोरट्यांची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करत उल्हासनगरातून त्यांच्या मुसक्या आवळल्या. तत्पूर्वी बॅग लुटल्यानंतर ते धुळे, सुरत आणि तेथून उल्हासनगरला पळून गेले होते. सुरुवातीला ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले होते. मात्र, उल्हासनगरात ते पोलिसांच्या ताब्यात आले.

लाखोंची रोकड हस्तगत

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 15 लाख रुपयांपैकी 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत केले आहेत. उर्वरित रक्कम त्यांनी कोठे ठेवली आहे, कशी खर्च केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी मनोज मोकळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर नाशिक, धुळे येथील पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. जळगाव पोलिसांनी अखेर त्याला गजाआड केले आहे.

'हाय लाईफस्टाईल'मुळे भरत नव्हते नजरेत

दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. ठिकठिकाणी जबरी चोरी करून ते पैसे कमवत होते. चोरीच्या पैशातून ते हाय लाईफस्टाईलमध्ये राहत होते. म्हणूनच ते कुणाच्या नजरेत भरत नव्हते. हाय लाईफस्टाईलमध्ये राहून चोरी करणे ही दोघांची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details