जळगाव -दुचाकी चोरूननंदूरबारकडे जात असताना दुचाकीस्वाराचे रस्त्यात एका ट्रकचालकाशी भांडण झाले. या भांडणात त्या दुचाकीस्वाराने ट्रकचालकाला धमकी दिल्याने ट्रकचालकाने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराला अटक केली. यादरम्यान त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी त्याने जळगाव शहरातून चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नंदूरबार तालुका पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक करून दुचाकीसह जळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. श्रीकांत प्रकाश मोरे (24) अमळगाव ता. अमळनेर असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, श्रीकांत याला अटक केल्यावर जळगाव पोलिसांनी सोमवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्रीडा संकुलासमोरून चोरली होती दुचाकी -
शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयात विनयकुमार अक्षयकुमार जोशी (56) रा. नेहरूनगर हे कामाला आहेत. 23 ऑक्टोंबर रोजी जोशी हे कार्यालयात आले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर स्टेडीयम कॉम्प्लेक्स आवारात उभी केली. काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांची दुचाकी क्र. एमएच. 15 बीएच 4533 ही अद्यात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दोन दिवसांची पोलीस कोठडी -
श्रीकांत मोरे याने दुचाकी चोरल्यानंतर नंदुरबारकडे येत असताना दुचाकीचा कट मारण्यावरुन त्याचे ट्रकचालकाशी भांडण झाले होते. यावेळी पोलिसांनी भांडण सोडविले. मात्र, भांडणानंतरही श्रीकांत याने ट्रकचालकाला पुढे चाल तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नंदुरबार तालुका पोलिसांनी श्रीकांत मोरे याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचा भांडाफोड झाला होता. चौकशीत ती जळगाव शहरातून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांना संपर्क साधून तुमच्या हद्दीत चोरी झालेली दुचाकी जप्त केली असल्याचे सांगितले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रविण भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय सोनार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून संशयित श्रीकांत मोरे यांच्यासह दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, श्रीकांत याला अटक केल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी त्याला सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.