महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावच्या सराफ बाजारात गुरुपुष्यामृत योग असूनही मंदीच; ग्राहकांचा सोने खरेदीत हात आखडता

आज गुरुपुष्यामृत योग आहे. हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण, सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात मात्र मंदीचे सावट आहे. कोरोना व ओला दुष्काळ अशा कारणांमुळे ग्राहकांनी सोने खरेदीत आपला हात आखडता घेतला आहे. यामुळे सराफ व्यवसायिकांच्या पदरी निराशाच आली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Sep 30, 2021, 4:48 PM IST

जळगाव -आज गुरुपुष्यामृत योग आहे. हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण, सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात मात्र मंदीचे सावट आहे. कोरोना व ओला दुष्काळ अशा कारणांमुळे ग्राहकांनी सोने खरेदीत आपला हात आखडता घेतला आहे. एरवी गुरुपुष्यामृत योग साधून सोने खरेदीसाठी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असायची. पण, आज (दि. 30) त्याच्या अगदी उलट चित्र आहे. बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक सोने खरेदीला येत आहेत. त्यामुळे सराफ व्यवसायिकांच्या पदरी निराशा आली आहे.

बोलताना ग्राहक

जळगावच्या सराफ बाजाराची देशभर ओळख आहे. येथील सोने व चांदी खरेदीचा व्यवहार हा सचोटीचा मानला जातो. त्यामुळे जिल्हाच नव्हे तर परजिल्ह्यातील ग्राहक सोने व चांदीचे दागिने खरेदीसाठी याठिकाणी दाखल होतात. दरवर्षी गुरुपुष्यामृत योगच्या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जळगावच्या सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची आर्थिल उलाढाल होत असे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध आले. परिणामी बाजारपेठेवर परिणाम झाला. आता सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे ठप्प असलेले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. नियमावलीच्या अधीन राहून बाजारपेठ पूर्णपणे उघडली आहे. त्यामुळे यावर्षीच्या गुरुपुष्यामृत योगच्या मुहूर्तावर सराफ बाजारात चैतन्य निर्माण होईल, अशी सराफांना आशा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

दर घसरले, पण खरेदीसाठी ग्राहक नाहीत

गुरुपुष्यामृत योगच्या मुहूर्तावर सराफ बाजारात उलाढाल कशी आहे, याबाबत माहिती देताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुणिया यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट आहे. सराफ बाजाराला तर खूपच फटका बसला. अजूनही व्यवहार सुरळीपणे सुरू झालेले नाहीत. कोरोनामुळे उद्योगधंदे दीर्घकाळ बंद होते. त्यामुळे लोकांकडे पैसा नाही. आता व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी सराफ बाजारातील उलाढाल वाढलेली नाही. आज गुरुपुष्यामृत योग असला तरी ग्राहकांची सोने खरेदी करण्यासाठी हवी तशी गर्दी नाही. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे लोकांनी सोने खरेडीकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे सोने व चांदीचे दर कमी झालेले असले तरी ग्राहकांचा खरेदीसाठी प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. यापुढे सणासुदीला हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा असल्याचे लुणिया यांनी सांगितले.

असे आहेत सोने व चांदीचे आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्या दरांवर होत असतो. सध्या सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत. गुरुवारी सकाळी जळगावच्या सराफ बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा सोन्याचे दर 47 हजार 400 रुपये प्रतितोळा (3 टक्के जीएसटीसह) तर चांदीचे दर 62 हजार रुपये प्रतिकिलो (3 टक्के जीएसटीसह) असे नोंदवले गेले. गेल्या दोन ते तीन दिवसात दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने चढउतार राहिला आहे. दोन दिवसात सोन्याचे दर 200 ते 300 रुपयांनी तर चांदीचे दर प्रतिकिलो मागे एक ते दीड हजाराने खाली आले आहेत. सोने व चांदीचे दर कमी होत असताना ग्राहकांचा मात्र, खरेदीसाठी अपेक्षित प्रतिसाद नसल्याचेही गौतमचंद लुणिया यांनी सांगितले.

कोरोना काळापेक्षा स्थिती चांगली

जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेतली तर आज सराफ बाजारात काहीशी चांगली आहे. आज गुरुपुष्यामृत योग आहे. अपेक्षेप्रमाणे ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी नसली तरी काही ग्राहक त्यांच्या बजेटनुसार सोने खरेदी करत आहेत. गुरुपुष्यामृत योगसाठी सराफी पेढ्यांमध्ये दागिन्यांच्या खास व्हरायटी उपलब्ध आहेत. वजनाने हलके, बारीक नक्षीकाम असलेले दागिने महिला ग्राहकांच्या पसंतीला उतरतात, हे लक्षात घेऊन दागिन्यांच्या व्हरायटी आहेत. आपल्याकडे पिवळेधम्मक चमकणाऱ्या दागिन्यांना अधिक मागणी असते. आगामी काळात सराफ बाजारातील परिस्थिती बदलेल, असे स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.

हेही वाचा -एकनाथ खडसेंविरुद्ध ईडीची कारवाई!.. फार्महाऊस सील केल्याची चर्चा, रोहिणी खडसेंकडून स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details