जळगाव -नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्या दाम्पत्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील लग्नाचे दागिन्यांसह रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगरात घडली. या घटनेत, एकुण 1 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
जिनेंद्र मधुकर सैतवाल (वय-४७, रा. राधाकृष्ण नगर, नेमाडे नगर परिसर) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्याच्या मुलीचे 7 मार्च 2021 रोजी लग्न असल्यामुळे लग्नासाठी दागिने व रोकड घरात होते. दरम्यान, जामनेर येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता घराला कुलूप लावून परिवारासह जामनेरला निघून गेले. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील दोन लोखंडी कपाट फोडून कपाटातील 20 हजार रूपयांची रोकड, 93 हजार रूपये किंमतीचे 31 ग्रॅम सोने, 8 हजार 600 रूपये किंमतीची पायातील चांदीचे जोडवे, 37 हजार रूपये किंमतीचे मुलीच्या लग्नाच्या साड्या आणि घागरा, असा एकुण 1 लाख 58 हजार रूपये किंमतीची मुद्देमाल ऐवज लांबविला.