जळगाव- शहरातील अयोध्या नगर परिसरात असलेल्या एका बंगल्यात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
अयोध्या नगरातील गणपती मंदिराजवळ राहणारे अशोक फुलचंद जैस्वाल यांच्या राहत्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. अशोक जैस्वाल यांच्या काकांचे निधन झाल्याने जैस्वाल कुटुंबीय रविवारी रात्री अंत्यसंस्कारासाठी मध्यप्रदेशातील खंडवा येथे गेलेले होते. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.