जळगाव - जिल्ह्यात शनिवारी सकाळी 11च्या सुमारास बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पहिली लस टोचून घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेचे ते जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले. त्यांच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी लस घेतली.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'असे' झाले लसीकरण
लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वात पहिली लस घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची प्रतिक्षालयात स्क्रिनिंग करण्यात आली. त्यानंतर कोविन अॅपमध्ये त्यांच्या नोंदणीची खात्री करून कागदपत्रे तपासण्यात आली. सर्व माहितीची चाचपणी केल्यानंतर त्यांना लसीकरण कक्षात अधिपरिचारिका कुमुद जवंजार यांनी कोविशिल्ड लस टोचली. त्यानंतर पुढील डोसची माहिती घेऊन डॉ. रामानंद निरीक्षण कक्षात दाखल झाले. त्याठिकाणी ते अर्धा तास थांबले. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याची खात्री झाल्यावर ते दैनंदिन कामावर गेले. त्यांच्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, अधिपरिचारिका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, शरीर रचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण कासोटे, अधिपरिचारिका जयश्री जोगी यांनी लस घेतली.