जळगाव - महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच हे घडले आहे. सरकारमध्ये नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात असताना ते माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षण आणि महाविकास आघाडीची भूमिका या विषयांवर त्यांनी मतप्रदर्शन केले.
महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली; भाजप नेते गिरीश महाजन यांची टीका काय म्हणाले गिरीश महाजन?
'मराठा समाजाची घोर फसवणूक या सरकारने केलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विधानसभेत कायदा केला होता. मागासवर्गीय आयोगही नेमला होता. सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्याठिकाणी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला. दुर्दैवाने सरकार बदलले. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथे निर्णय बदलला आहे. सुरुवातीपासून या सरकारमध्ये एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या प्रकारे भांडत होते. त्यांचे नेते व मंत्री वेगवेगळे मत मांडत होते. यांच्या मनातच हे आरक्षण व्हावे, हे सरकारमधल्या मंत्र्यांना वाटत नव्हते. नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव असल्याने हे आरक्षण टिकले नाही. कोणाचे कोणाला काहीही माहिती नव्हते. तिन्ही पक्षांमधील विसंगती तसेच वादामुळे हे आरक्षण टिकवण्यात अपयश आले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण टिकले नाही-
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. अर्धे मंत्री काय सांगायचे तर अर्धे मंत्री काय सांगायचे. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूने तोंड करून उभे होते. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमध्ये एकमत होते का? हा प्रश्न आहे. सगळ्या मंत्र्यांचे वक्तव्य तपासून पाहा, त्यावर हे लक्षात येते. कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही, म्हणून हा दुर्दैवी दिवस उगवला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही कायम सरकार सोबत होतो आणि आहोत. आमचे नेते चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण जे काय करू ते आम्हीच करू, विरोधी पक्षाला सोबत घेणार नाही, ही सरकारची मानसिकता आणि आडमुठेपणा आरक्षणाला नडला, असेही गिरीश महाजन म्हणाले.