महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण घसरले - सीरो सर्व्हे जळगाव

भारतीय वैद्यक परिषदेच्या पथकाने २४ डिसेंबर २०२० रोजी जळगाव जिल्ह्यातील दहा ठिकाणी ४२७ जणांचे नमुने सीरो सर्वेक्षणात घेतले होते. त्यातील १२१ जणांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण घसरले
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण घसरले

By

Published : Feb 7, 2021, 9:44 AM IST

जळगाव-कोरोना संसर्गाचा आवाका लक्षात घेण्यासाठी भारतीय वैद्यक परिषदेने म्हणजेच आयसीएमआरने, डिसेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यातील १० ठिकाणी तिसरा सीरो सर्व्हे केला होता. त्याचा अहवाल नुकताच आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला आहे. त्यात जिल्ह्यातील नागरिकांमध्ये २८.३४ टक्केच अँटीबॉडीज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत करणारी 'हर्ड इम्युनिटी' निर्माण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाच्या बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.


केवळ १२१ जणांमध्ये अँटीबॉडीज
भारतीय वैद्यक परिषदेच्या पथकाने २४ डिसेंबर २०२० रोजी जळगाव जिल्ह्यातील दहा ठिकाणी ४२७ जणांचे नमुने सीरो सर्वेक्षणात घेतले होते. त्यातील १२१ जणांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. जळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४२ ते ४५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे केवळ ४०० व्यक्तींचे नमुने घेऊन त्यातील अँटीबॉडीजचा अंदाज वर्तवणे एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने शक्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार म्हणतात. मात्र, सीरो सर्वेक्षणात एकूण लोकसंख्येत किती अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत, त्याबाबतचा अंदाज लावणे शक्य होते. म्हणून हा सीरो सर्व्हे केला जातो.

या ठिकाणी घेतले नमुने

तिसऱ्या सीरो सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील मोहराळे, तांदलवाडी, कडगाव, धरणगाव ग्रामीण, वरखेड, नाईकनगर, गोराडखेडे, भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव अशा दहा ठिकाणी एकूण ४२७ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यात १२१ जणांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची एकूण टक्केवारी २८.३४ इतकी आहे.


हर्ड इम्युनिटीबद्दलचे तज्ञांचे अंदाज चुकले-

जळगाव जिल्ह्यात मे २०२० मध्ये पहिला सीरो सर्व्हे झाला होता. त्यात अँटीबॉडीजची टक्केवारी अवघी ०.५ टक्के इतकी होती. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये जिल्ह्यात दुसरा सीरो सर्व्हे झाला. त्यात अँटीबॉडीजचे प्रमाण २५.९ टक्के इतके होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने अहवालाच्या टक्केवारीपेक्षा प्रत्यक्षात जास्त म्हणजे, ५० ते ६० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत अँटीबॉडीज आढळणे म्हणजे हर्ड इम्युनिटी तयार होणे, असे मानले जाते. मात्र, तिसरा सीरो सर्व्हे झाला त्या काळात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढून पुन्हा घसरला होता. दुसऱ्या सर्व्हेच्या तुलनेत तिसऱ्या सर्व्हेच्या काळात अधिक लोकसंख्येला संसर्ग झाला होता. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज आढळणे अपेक्षित होते. परंतु, तिसऱ्या सर्व्हेत २८.३४ टक्के अँटीबॉडीज आढळून आल्याने वैद्यकीय तज्ञांचे अंदाज चुकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details