महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या ठिकाणी' झाले होते अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन - राष्ट्रीय काँग्रेस

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचा बहुमान फैजपूरला मिळाला होता.

फैजपूर

By

Published : Aug 16, 2019, 12:45 PM IST

Updated : Aug 16, 2019, 2:45 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील फैजपूर या शहराचा एक ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात नावलौकिक आहे. कारण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचा बहुमान फैजपूरला मिळाला होता. एवढेच नव्हे तर राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, साने गुरुजी, अशा अनेक मान्यवरांचा पदस्पर्श देखील या अधिवेशनाच्या निमित्ताने या शहराला लाभला आहे. काँग्रेसच्या अधिवेशनावेळी महात्मा गांधी ९ दिवस फैजपुरात राहिले होते. आधी शहरी भागापर्यंत मर्यादित असलेली स्वातंत्र्य लढ्याची चळवळ महात्मा गांधींनी येथून ग्रामीण भागाकडे नेली.

फैजापूर


२७ ते २९ डिसेंबर १९३६ या काळात फैजपूर शहरात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन पार पडले होते. ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या राष्ट्रीय आंदोलनाचे ते एक महापर्वच होते. ३ दिवसांच्या कालावधीत पार पडलेल्या या अधिवेशनात देशभरातील नेतेमंडळी, स्वातंत्र लढ्यातील क्रांतिकारक हिरीरीने सहभागी झाले होते. तब्बल दीड लाख लोकांनी या अधिवेशनात सहभाग नोंदवला होता, असे या अधिवेशनाचे साक्षीदार सांगतात.


जुलमी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा तीव्र करावा, एकसंघ भारतासाठी परस्पर हेवेदावे तसेच गटतट विसरून भारतीयांनी एकत्र यावे, ब्रिटीश सरकारने शेतकऱ्यांना सरसकट करमाफी म्हणजेच 'लगान' वसुली बंद करावी, भारतीयांना जगण्याचा हक्क प्रदान करावा, असे काही महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले होते. या अधिवेशनात महात्मा गांधींनी मोलाची भूमिका पार पाडली होती. म्हणूनच आजही जेव्हा काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाचे नाव घेतले जाते, तेव्हा महात्मा गांधींचा आवर्जून उल्लेख केला जातो.

फैजपूर अधिवेशन आणि गांधी

फैजपूर अधिवेशन आणि महात्मा गांधी यांचा फार जवळचा संबंध राहिला आहे. स्वातंत्र्य लढ्याची चळवळ जेव्हा उभी राहिली तेव्हा ती फक्त शहरी भागापुरती मर्यादित होती. त्या काळात देशातील ८० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत होती. या जनतेला स्वातंत्र्य लढ्याची चळवळ माहिती देखील नव्हती. ग्रामीण भागातील जनता स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सहभागी झाल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, ही बाब गांधीजी जाणून होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसचे विचार ग्रामीण भागात रुजवण्याची संकल्पना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर मांडली होती. १९३४ मध्ये अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ स्थापन केल्यानंतर महात्मा गांधींनी काँग्रेसचे अधिवेशन शहरी भागाऐवजी ग्रामीण भागात भरविण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूरसारख्या छोट्याशा गावात झाले होते.

फैजपुरलाच का झाले होते अधिवेशन?


अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूरसारख्या छोट्याशा गावात का झाले? याचाही फार रंजक इतिहास आहे. १४ एप्रिल १९३६ रोजी काँग्रेसचे लखनऊला अधिवेशन झाले होते. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असणारे आचार्य नरेंद्र देव नामक महाशयांनी या अधिवेशनात काँग्रेसचे पुढचे अधिवेशन हे महाराष्ट्रात झाले पाहिजे, असा ठराव मांडला होता. मात्र, त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढचे अधिवेशन हे गुजरातमध्ये, खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर प्रांतात तर सत्यमूर्तींनी अधिवेशन तामिळनाडूत व्हावे असे पर्याय सुचवले होते. वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे निर्णय घेण्यात अडसर येत असल्याने सर्वानुमते मतदान घेण्यात आले. त्यात महाराष्ट्राच्या बाजूने सर्वाधिक मते पडली होती. म्हणून महाराष्ट्रात अधिवेशन घेण्याचे ठरले होते. मात्र, त्याही नंतर आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र प्रांतिक कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रात अधिवेशन नेमके कुठे घ्यावे, याचा पेच उद्भवला होता. बैठकीला उपस्थित असलेले ३९ सदस्य आणि ३०० कार्यकर्त्यांमधून साताऱ्यातील कराड आणि पूर्व खान्देश, असे 2 पर्याय समोर आले होते. येथेही २ वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह असल्याने सदस्यांचे मतदान घेण्यात आले. ३९ सदस्यांपैकी कराड आणि पूर्व खान्देशच्या बाजूने समसमान १९-१९ मते पडली होती. तेव्हा बैठकीचे अध्यक्ष नरेंद्र देव यांच्या मतावर अधिवेशनाचे ठिकाण ठरणार होते. देव यांनी पूर्व खान्देशातील धनाजी नाना चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम जवळून पाहिले होते. त्यांना न्याय मिळावा म्हणून देव यांनी आपले मत पूर्व खान्देशच्या बाजूने दिल्याने अखेर अधिवेशनाच्या ठिकाणाचा तोडगा निघाला. पूर्व खान्देशातून धनाजी नानांचे गाव खिरोदा आणि फैजपूर अशी २ गावे सुचविण्यात आली होती. मात्र, खिरोदा गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे नव्हते. तुलनेने फैजपूर मुख्य रस्त्यावर आणि सावदा रेल्वे स्थानकापासून जवळ होते. त्यामुळे अधिवेशनासाठी फैजपुरची निवड झाली होती.

फैजपूरचे 'टिळकनगर' नामकरण

या अधिवेशनासाठी तेव्हा फैजपूरचे 'टिळकनगर' असे नामकरण करण्यात आले होते. अधिवेशनस्थळी उभारलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाद्वार' असे केले होते. हे महाद्वार तत्कालीन भारतीय कलाकार नंदलाल बोस यांनी उभारले होते. महाद्वाराच्या प्रतिकृतीची निर्मिती खिरोद्याचे कलाकार मनोहर गुरुजी व मधुसुदन देशपांडे यांनी केली होती. अधिवेशनासाठी आलेल्या प्रत्येक नेत्याला राहण्यासाठी बांबूंची कुटी (झोपडी) तयार केली होती. महात्मा गांधी देखील अशाच एका कुटीत राहिले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, साने गुरुजी, पंडित मदनमोहन मालवीय, डॉ. राजेंद्र प्रसाद, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, आचार्य नरेंद्र देव, खान अब्दुल गफार खान, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, पंडित गोविंद वल्लभ पंत, पुरुषोत्तम दास टंडन अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

Last Updated : Aug 16, 2019, 2:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details