महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद ठेवणे हा एक राजकीय डाव; हिंदुराष्ट्र सेनेचा आरोप - कोरोना गाईडलाईन

कोरोनाच्या नावाखाली हिंदूंची मंदिरे, देवालये बंद ठेवणे हा एक राजकीय डाव आहे. राजसत्तेचा केलेला गैरवापर आहे. कोरोनाच्या काळात जर एका वर्गाला सामूहिक साधनेचा अधिकार मिळतो तर दुसऱ्या वर्गाला तो का डावलला जातो? असा सवाल हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी सरकारला केला आहे.

Hindu Rashtra Sena
Hindu Rashtra Sena

By

Published : Aug 29, 2021, 5:23 PM IST

Updated : Aug 29, 2021, 6:37 PM IST

जळगाव -कोरोनाच्या नावाखाली हिंदूंची मंदिरे, देवालये बंद ठेवणे हा एक राजकीय डाव आहे. राजसत्तेचा केलेला गैरवापर आहे. कोरोनाच्या काळात जर एका वर्गाला सामूहिक साधनेचा अधिकार मिळतो तर दुसऱ्या वर्गाला तो का डावलला जातो? असा सवाल हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हिंदुराष्ट्र सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी धनंजय देसाई हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख मोहन तिवारी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 'गुढीपाडव्याच्या सणाला राज्य सरकारकडून जीआर काढला जातो की एकत्र जमायचे नाही, मिरवणुका काढायच्या नाहीत. कायद्याचा त्याठिकाणी धाक दाखवला जातो. त्याचवेळी मोहरम सणासाठी मात्र मार्गदर्शक सुचना देण्यात येतात. हा भेदभाव लगेचच लक्षात येतो. हा विषय मी सांगण्याची गरज नाही. तर ती सर्वांच्याच मनातील उद्विग्नता आहे', असेही धनंजय देसाई म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई
मंदिरे बंद ठेऊन कोरोनाचा प्रतिबंध होणार आहे का?
आज उज्जैनसारखी मोठी देवळे उघडली जात आहेत. काशी विश्वनाथ यासारखे तीर्थक्षेत्र उघडले जात आहे. ज्याठिकाणी देशच नव्हे तर जगभरातून भाविक येत आहेत. बुद्धाची गया आज पूर्णपणे मोकळी झाली आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच बिहारमधील सर्व तीर्थक्षेत्रे आज सुरू झालेली आहेत. मग महाराष्ट्रातच असा कोणत्या स्वरूपाचा कोरोना आहे की जो फक्त देवळात गेल्यानंतरच फैलावणार आहे. आज सर्रासपणे राजकीय मेळावे होत आहेत. राजकारण्यांचे वाढदिवस जल्लोषात साजरे होत आहेत. मग हिंदूंची मंदिरे बंद ठेऊन अशी कुठली कोरोनाची लस शोधली जात आहे, असा सवालही देसाई यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदूंची मंदिरे बंद ठेऊन कोरोनाचा प्रतिबंध होणार आहे का? अशा राजकीय नपुंसकतेविरुद्ध हिंदुत्त्वाची लस टोचून या देशातली भ्रमिष्टता नष्ट करायला हवी, असेही देसाई म्हणाले.
बार उघडता मग मंदिरे का नकोत?
आज तुम्ही बेवड्यांसाठी बार उघडता मग भाविकांसाठी मंदिरे का उघडत नाहीत? जिथे सर्वप्रकारची आचारसंहिता पाळली जाते. एकमेकांपासून अंतर राखले जाते. स्पर्श होऊ दिला जात नाही. शांततेच्या वातावरणात साधना केली जाते, अशी तीर्थक्षेत्रे बंद ठेवली जातात, याचा आम्ही निषेध करतो. हा एकप्रकारे सरकारचा भ्रष्टवाद असल्याचेही धनंजय देसाई यांनी सांगितले.
सीएए द्रष्टेपणाचा निर्णय, हे आता लक्षात येतंय -
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर, केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी लागू केलेला सीएए हा निर्णय किती द्रष्टेपणाचा आहे? हे आता आपल्या लक्षात येत आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, अशी घोषणा जाहीरपणे लवकर व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका हिंदुराष्ट्र सेनेची असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताचे भारतीयत्व टिकवायचे असेल तर भारताची जी आध्यात्मिक मूळ सभ्यता आहे, ती टिकवावी लागणार आहे. त्यासाठी भारताला हिंदुत्व धारण केल्याशिवाय पर्याय नाही, असेही देसाई यांनी सांगितले.
Last Updated : Aug 29, 2021, 6:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details