जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव शहरात असलेल्या मरिमातेच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट तसेच दानपेटीतील रोकड लांबवली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून दानपेटी होती बंद
धरणगाव शहरात सोनवद रस्त्यावर मरिमातेचे मंदिर आहे. या मंदिरात शनिवारी मध्यरात्रीनंतर ही चोरीची घटना घडली आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मरिमातेचा चांदीचा मुकुट तसेच दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. चांदीचा मुकुट काढल्यानंतर चोरट्यांनी मंदिराची दानपेटी काढून मंदिराच्या मागच्या बाजूला नेली. त्याठिकाणी दानपेटी फोडून त्यातील रोकड लांबवली. दानपेटीत हजारो रुपयांची रक्कम होती. गेल्या अनेक दिवसांपासून दानपेटी उघडलेली नव्हती, त्यामुळे नेमकी किती रक्कम चोरीस गेली आहे, याची माहिती मिळाली नाही.