जळगाव - एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच जळगावातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. अवकाळीचे सावट कायम असताना उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. येत्या ४ दिवसांत तापमान ४४ अंशावर तर ११ एप्रिलपर्यंत ४६ अंशापर्यंत जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची पहिली लाट याच काळात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगावात गुरुवारी तापमानाने चाळिशी गाठल्याने लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर दिसणारी अनावश्यक गर्दीदेखील कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
जळगाव शहरातील तापमानात वाढ... हेही वाचा...विशेष ! राम नामाच्या लेखनातून केली रामायणातील पात्रांची चित्रनिर्मिती
जळगाव जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे. साेसाट्याचा वारा, गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे वातावरण अधूनमधून ढगाळ राहिले आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमान ३५ ते ३८ अंशापर्यंत स्थिर हाेते. ३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी तर तापमानाने चाळीशी गाठली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील गुरुवारचे दुपारचे तापमान अंगाची लाही करणारे ठरले. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे बऱ्यापैकी कमी झाल्याने बाजारपेठेसह रस्त्यावर गर्दी काही प्रमाणात कमी दिसली. शहरातील दाणाबाजार, किराणा दुकाने, फळ-भाजीपाला विक्रेते यांच्याकडे गर्दी कायम हाेती. फळे व भाजीपाला विक्रेत्यांकडे दुपारच्या वेळेत त्या तुलनेत गर्दी नगन्य हाेती.
हवामान खात्याचा अंदाज...
जळगावचे तापमान १ एप्रिल राेजी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत हाेते. वाऱ्याचा वेग ताशी १० किलाेमीटरपर्यंत हाेता. येत्या ५ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४४ अंशावरून ४४ अंशावर जावू शकते. तर ११ एप्रिलपर्यंत तापमान ४५ ते ४६ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची पहिली लाट या काळात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमान पुन्हा ४० अंशापर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.