महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाजनांच्या मतदारसंघात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा; ढालगाव ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेत भरवली शाळा - प्राथमिक शिक्षण व्यवस्था

ढालगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक उर्दू शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. सद्यस्थितीत या शाळेची पटसंख्या १८५ इतकी आहे. मात्र, एवढ्या पटसंख्येसाठी आवश्यक असलेले शिक्षक नाहीत.

जळगाव जिल्हा परिषदेत आंदोलन करताना विद्यार्थी

By

Published : Jul 4, 2019, 5:03 PM IST

Updated : Jul 4, 2019, 10:00 PM IST

जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जामनेर तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत १५ दिवसांपासून एकही शिक्षक हजर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट जिल्हा परिषद गाठली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवण्यात आली.

महाजनांच्या मतदारसंघात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा; पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

ढालगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक उर्दू शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. ढालगावसह परिसरातील गावांमधील आदिवासी तडवी, मुस्लीम समाजातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत या शाळेची पटसंख्या १८५ इतकी आहे. मात्र, एवढ्या पटसंख्येसाठी आवश्यक असलेले शिक्षक नाहीत. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या शाळेत फक्त ३ शिक्षक होते. हे शिक्षक पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सांभाळत होते. पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक कमी असल्याने शाळेसाठी शिक्षक वाढवून मिळावे, यासाठी ग्रामस्थांसह शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी वेळोवेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाला साकडे घातले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

गेल्या महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत ढालगाव शाळेतील तिन्ही शिक्षकांची दुसरीकडे बदली झाली. त्यांच्या जागी पुन्हा केवळ तीन शिक्षक नियुक्त करण्यात आले. मात्र, ते शिक्षक शाळेवर हजर झालेच नाहीत. बदली प्रक्रियेला १५ दिवसांचा कालावधी उलटूनदेखील शिक्षक हजर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जामनेर पंचायत समितीत सर्व विद्यार्थी नेले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन हा विषय मांडण्यात आला होता. त्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही शिक्षक हजर झालेच नाहीत.

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी शाळेला कुलूप ठोकून सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेत थेट जिल्हा परिषद गाठली. मात्र, ग्रामस्थांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याशी भेट होऊ शकली नाही. प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. एम. देवांग यांनी आंदोलकांची भेट घेऊन शाळेवर हजर न होणाऱ्या संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच ढालगाव शाळेसाठी पटसंख्येला आवश्यक असलेले शिक्षक देण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

या आहेत प्रमुख मागण्या -
ढालगाव जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेसाठी पटसंख्येसाठी आवश्यक असलेले शिक्षक देण्यात यावे.
बदली प्रक्रियेनंतर शाळेवर हजर न होणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी.
ढालगाव जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात याव्या.

Last Updated : Jul 4, 2019, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details