जळगाव-शेतामध्ये वन्यप्राणी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करतात, असे असले तरी वनसंरक्षक कायद्यानुसार वन्यप्राण्यांना हानी पोहोचवता येत नाही. मग वन्यप्राण्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका न होता शेतीपिकांचे नुकसान कसे टाळता येईल, या विचारातून एका उपक्रमशील शिक्षकाने अनोखी तोफ बनवली आहे. या तोफेच्या नुसत्या आवाजाने वन्यप्राणी धूम ठोकतात. विशेष म्हणजे, टाकाऊ वस्तूंपासून अगदी अल्पखर्चात ही तोफ बनवली असून, ती परिणामकारक सिद्ध झाली आहे.
पिकांच्या संरक्षणासाठी शिक्षकाने बनवली अनोखी तोफ... - गणेश धांडे जळगाव
गणेश रघुनाथ धांडे असे तोफ बनवणाऱ्या उपक्रमशील शिक्षकाचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील रहिवासी आहेत. गणेश धांडे यांनी बनवलेली तोफ परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. धांडे हे जामनेर येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक आहेत.
गणेश रघुनाथ धांडे असे तोफ बनवणाऱ्या उपक्रमशील शिक्षकाचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील रहिवासी आहेत. गणेश धांडे यांनी बनवलेली तोफ परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. धांडे हे जामनेर येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक आहेत. साळशिंगी गावाच्या शिवारात त्यांची 5 एकर शेती आहे. आपल्या शेतात त्यांनी लिंबू फळबाग लागवड केली असून, त्या बागेत कांद्याचे आंतरपीक घेतले आहे. शेतात काही ठिकाणी मिरचीची देखील लागवड केली आहे. साळशिंगी गावाच्या लगतच वनक्षेत्र असल्याने या परिसरात हरीण, रानडुक्कर, नीलगाय यासारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. हे वन्यप्राणी शेतीपिकांची सतत नासधूस करत असतात. वन्यप्राण्यांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल? या विचारातून त्यांच्यातील उपक्रमशीलता जागृत झाली आणि त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अनोखी तोफ बनवली.
अशी बनवली तोफ-
गणेश धांडे यांनी दीड फूट लांबीचा अडीच इंची व्यास असलेला पीव्हीसी पाईपचा तुकडा घेतला. तो तुकडा एका बाजूने दोन फूट लांबीच्या दोन इंची व्यास असलेल्या पीव्हीसी पाईपच्या तुकड्याशी रिड्यूसरच्या मदतीने जोडला. अडीच इंची पाईपचे तोंड एका बाजूने झाकण लावून बंद केले. त्या झाकणामध्ये एलपीजी गॅस पेटविण्याचे लायटर बसवले. नंतर अडीच इंची व्यास असलेला पीव्हीसी पाईपला लायटर असलेल्या बाजूला वर एक छिद्र पाडले. या छिद्रातून पाईपमध्ये कार्फेटचे दोन तीन खडे टाकायचे. त्या खड्यांवर थोडं पाणी आत टाकून थोड्या वेळाने लायटर पेटवायचे. लायटर पेटताच त्या तोफेतून बंदुकीची गोळी झाडल्याप्रमाणे जोरात आवाज होतो. या प्रक्रियेत कुठही मनुष्याला हानी किंवा इजा होण्याची भीती नसते. मात्र, होणाऱ्या आवाजामुळे वन्यप्राणी दूर पळून जातात. ही तोफ गणेश धांडे यांनी अगदी कमी खर्चात बनवली आहे. धांडे यांच्याकडून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ही तोफ बनवून घेतली आहे.
अशी सुचली कल्पना-
गणेश धांडे हे शिक्षक आहेत. त्यांना विज्ञानाची चांगली कल्पना आहे. कार्फेटच्या हवाबंद खड्यांवर पाणी टाकले की रासायनिक अभिक्रिया होऊन गॅस निर्मिती होते. या गॅसला ठिणगी लागली की त्याचा स्फोट होऊन मोठा आवाज होतो. हा प्रयोग त्यांना माहिती होता. म्हणूनच त्यांनी या कल्पनेतून तोफ बनवली. पाईपमध्ये असलेले कार्फेटचे खडे आकाराने लहान असल्याने त्यामुळे आग न लागता नुसता जोरात आवाज होतो. दरम्यान, या तोफेचा वापर केल्याने वन्यप्राणी पळवून लावण्यास मदत होते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला हानी पोहचत नाही. त्यामुळे वनसंरक्षक कायद्याचे उल्लंघन होत नाही. दिवाळीत मुलांनी फटाके न फोडता या तोफेचा वापर केला तर फटाके फोडण्याचा आनंद तर त्यांना मिळेलच शिवाय पैसे वाचून पर्यावरणाची हानी रोखता येईल, असे गणेश धांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.