जळगाव -वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (रविवारी) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली आहे. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
वडील करतात सालदारकी
ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी आहेत. राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
आई-वडील शेतात गेले होते कामाला
ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. चिंचेचे झाड झोपडीवर कोसळल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण झोपडी दाबली जाऊन झोपडीतील सामानांचे नुकसान झाले आहे.