जळगाव - बोदवड तालुक्यात असलेल्या जामठी येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी 7 वाजता ही घटना उजेडात आली. दरम्यान, जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले असून दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना समोर येत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जामठी येथे शर्माजी कॉप्लेक्समध्ये टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडले आणि एटीएम मशीन उखडून टाकत नासधूस देखील केली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास समोर आला. गावातील काही ग्रामस्थांना एटीएम मशीन उखडून टाकलेले दिसून आले. चोरी झाल्याची खात्री होताच घटनेची माहिती बोदवड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उशिरापर्यंत बँकेचे अधिकारी दाखल न झाल्याने एटीएम मशिनमधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली? हे स्पष्ट होऊ शकले नाही.