जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने मुंबईच्या धर्तीवर 'टास्क फोर्स' गठीत करून त्यातील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना बाधितांवर उपचार करावेत. कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करावे, संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन त्याचे अहवाल 48 तासांच्या आत येतील; या दृष्टीने नियोजन करावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या लढ्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणेला दिला.
जळगावातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर टास्क फोर्स स्थापन करणार : राजेश टोपे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे बुधवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी उपस्थित होते.
'जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. या सर्वेक्षणातून कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचे स्वॅब घ्यावेत. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण लगेचच पूर्ण झाले पाहिजे. तरच कोरोनाला नियंत्रणात आणणे शक्य होईल. या कामात दिरंगाई होता कामा नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक निधी, यंत्रसामग्री उपलब्ध करुन दिली आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसह अन्य रिक्त पदे करारावर भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यांनी गरजेनुसार ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही' अशा इशारा यावेळी मंत्री राजेश टोपेंनी दिला.
हेही वाचा...स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्या; ममता बॅनर्जींची मागणी..
'आयएमए'च्या डॉक्टरांकडून दररोज मदत व्हावी
कोरोनाच्या लढ्यात आयएमएच्या डॉक्टरांनी शासकीय आरोग्य यंत्रणेला दररोज पूर्णवेळ मदत करणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत ही मदत अत्यंत गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता आयएमएशी निगडीत तज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सेवा बजावली पाहिजे, असे निर्देशही टोपे यांनी दिले.
रिक्त पदांच्या मुद्यावरून बैठकीत खल
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिस्तरीय उपचार पद्धती राबवली जात आहे. त्यानुसार तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथे डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्स, वॉर्डबॉय असलेच पाहिजेत. कोविड संदर्भात काही मदत हवी असेल तर जिल्हाधिकारी यांना सर्व अधिकार प्रदान केले आहेत. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांची पदे रिक्त असल्यास ती तातडीने भरावीत. रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने जाहिरात काढून, मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही राजेश टोपेंनी केल्या. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांतील रिक्त पदांचा मुद्दा बैठकीत उपस्थित होताच टोपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाहीचे अधिकार असताना पदे आतापर्यंत का भरली नाहीत? असा सवाल करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 'वॉर रूम'
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 'वॉर रूम' उभारण्याचे निर्देशही आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. अडचणी तसेच उपाययोजना याबाबतचा सर्व आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी या वॉर रूममधून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तालुकास्तरावर उभारलेल्या संस्थात्मक अलगीकरण कक्षांमधील स्वच्छता, तेथील संशयितांना चांगले जेवण मिळावे, त्याठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर्स असायला हवेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तर जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, यासाठी कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना सूचना करण्यात आल्या. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाधिक खासगी रुग्णालये अधिग्रहीत करून त्यांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित करा, या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार होत आहेत का? याकडेही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अन्यथा खासगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शक्य त्या उपाययोजना करत आहे. अशा परिस्थितीत सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी फिजिशियन्स व इन्सेन्टीव क्षेत्रातील तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना वेतनसुद्धा अदा करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा. तसेच जे खासगी रुग्णालये सुरू होणार नाहीत, त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी, असेही निर्देश मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
हेही वाचा...जाणून घ्या, चक्रीवादळाला कसे मिळाले 'निसर्ग' नाव?