जळगाव- सूर्यकन्या तापीमातेचा जन्मोत्सव सोमवारी आषाढ शुक्ल सप्तमीच्या औचित्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमृतमयी असलेल्या तापी जन्मोत्सव सोहळ्यात दाखल झालेल्या दिंड्या-पताकांमुळे तापीकाठ भाविकांच्या मांदियाळीने फुलला होता.
सूर्यकन्या तापीमातेचा जन्मोत्सव उत्साहात साजरा; भाविकांच्या मांदियाळीने फुलला तापीकाठ रावेर तालुक्यातील अजनाड गावी तापी नदीकाठी हा सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातून आलेल्या शेकडो भाविकांनी हा सोहळा 'याची देही, याची डोळा' अनुभवला. रावेरातील छोट्या दत्त मंदिरातील पुरोहित नथ्थू शास्त्री दुबे महाराज यांच्या प्रेरणेने अजनाड येथील प्रगतशील शेतकरी विनायक शामू महाजन यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या 20 वर्षांपासून तापी जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येतो. ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.
फैजपूरचे महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरी स्वामी महाराज, श्री स्वामीनारायण गुरुकुलचे श्री स्वामी भक्त प्रकाशदास शास्त्री महाराज, वृंदावन धामचे श्री संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या हस्ते तापी मातेचे पूजन करण्यात आले. महाआरतीनंतर तापी मातेची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. 75 मीटर लांब साडीचोळीचा आहेर देखील अर्पण करण्यात आला. तापी पूजन व सत्संग सोहळ्याचा दुग्धशर्करा योग भाविकांनी अनुभवला.
दक्षिण द्वीपकल्पात नर्मदेनंतरची दुसरी मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी ओळखली जाते. सूर्यकन्या तापी नदी तीन राज्यातील 76 हजार 800 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रासाठी वरदान ठरली आहे. या तापी नदीने जिल्ह्यातील 130 किमी लांब क्षेत्र सुजलाम सुफलाम केले आहे. जिल्ह्यात केळी पट्टा बहरण्यात तापी नदीचे मोठे योगदान असल्याने तिच्या काठावरील शेतकरी, रहिवासी यांच्यासाठी ती खऱ्या अर्थाने मातेसमान आहे. या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी दरवर्षी तिचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
या जीवनदायिनीचे पूजन करून व तिची खणा-नारळाने ओटी भरुन कृतार्थ होण्यासाठी तापी तटावर भाविक दिंड्या-पताका घेऊन दाखल होतात. या सोहळ्यामुळे सूर्यकन्या तापी मातेला उत्साहाचे भरते येते.