जळगाव -शहरातील रिंगरोड चौकातील गोकुळ स्वीट मार्टमध्ये समोस्यात पालची शेपटी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण या स्वीट मार्टमध्ये नाश्ता करण्यासाठी आले होते. समोसा खात असताना एका तरुणाला अर्धा समोसा खाऊन झाल्यावर समोस्यात पालची शेपटी दिसली. त्यानंतर त्या तरुणाला उलट्या झाल्या. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. संबंधित तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? -
खोटेनगरातील रहिवासी गौरव पाटील या तरुणासह त्याचे मित्र शंभू भोसले व हरीश भोसले हे दुपारी १ वाजेच्या सुमारास गोकुळ स्वीट मार्टमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. या ठिकाणी गौरवने समोसा तर त्याच्या मित्रांनी खमण मागविले. समोसा अर्धा खाल्ल्यानंतर त्याला कडवटपणा जाणवला. त्याने समोसा पाहिल्यानंतर त्यात पालची शेपटी आढळून आली. त्यानंतर त्याला काही वेळाने उलट्या झाल्या. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.