जळगाव -जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आज (बुधवारी) सकाळी त्यांचा मृतदेह एरंडोल शहरापासून काही अंतरावर असलेल्या पळासदळ शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर पाटील यांचा घातपात झाल्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी वर्तवली आहे. त्यांचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.
प्रश्न अनुत्तरीत
किशोर पाटील हे मूळचे चाळीसगाव तालुक्यातील कुंझर या गावचे रहिवासी होते. ते एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवारत होते. त्यांच्या पत्नीही शिक्षिका आहेत. पाटील दाम्पत्य एरंडोल शहरातील आदर्श नगरात वास्तव्याला होते. दरम्यान, किशोर पाटील हे आज पळासदळ शिवारात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांचा कुणी घातपात केला का? हे अनुत्तरीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पाटील यांचा मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेद्वारे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.