जळगाव -प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा जिल्हा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना खळबळजनक शुक्रवारी दुपारी घडली. चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (वय 35, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत कैद्याचे नाव आहे. चिन्या याच्या मृत्यूमागे काहीतरी घातपात झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. कारागृह प्रशासनासह पोलिसांनी या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसल्याने गूढ कायम आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप - jalgaon district jail death
जळगाव जिल्हा कारागृहात एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नसून घातपात झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयाने केला आहे. चिन्या उर्फ रवींद्र जगताप असे मृताचे नाव आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता काही तरुणांचा वाद झाला होता. या वादात एकावर चॉपरने प्राणघातक हल्ला झाला होता. या गुन्ह्यात चिन्या याच्यासह त्याच्या काही साथीदारांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर चिन्या न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तो जिल्हा कारागृहात होता. शुक्रवारी सकाळी 10 वाजता चिन्या याची पत्नी टिना व मुलगा साई हे दोन्ही जण त्याला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहात आलेले होते. मात्र, त्याची तब्येत बरी आहे, असे सांगून त्यांना घरी जाण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे ते घरी गेले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणीअंती त्यास मृत घोषित करण्यात आले. दुपारी ४ वाजता परिसरातील काही व्यक्तींनी चिन्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याच्या मृत्यूची माहिती दिली. नंतर कुटुंबीयांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात धाव घेतली.
सायंकाळी चिन्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. त्याठिकाणी त्याच्या कुटुंबीयांसह शिवाजीनगर भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. चिन्या याच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्याच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली.