जळगाव -जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी घडली. सुनील भागदेव तारू (वय - ३५, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानेच तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता.
जळगाव जिल्हा रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको मृत सुनीलवर गेल्या ३ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानेच सुनीलचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे नातेवाईकांनी संतप्त पवित्रा घेतला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींना शिक्षा करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, जिल्हापेठ पोलिसांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
हेही वाचा -VIDEO : औरंगाबादमध्ये भरधाव कारने 3 जणांना उडवले, दोघांचा मृत्यू
काय आहे नेमकं प्रकरण?
२ वर्षांपूर्वी सुनील तारू याचे काका कडू जगन्नाथ तारू यांना मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या खटल्यात तो गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याला समन्स बजावले होते. या समन्सच्या आधाराने मुक्ताईनगर पोलिसांनी त्याला शनिवारी (२९ फेब्रुवारी) चांगदेव येथील शेतातून अटक करीत भुसावळ कारागृहात नेले. त्याला ४ मार्चला जामीन द्यायचा होता. पोलिसांनी सुनील यास अटक केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली नव्हती. त्यामुळे पती अचानक बेपत्ता झाल्याने ४ दिवसांपासून त्याची पत्नी त्याचा शोध घेत होती. दुसरीकडे, मद्याचे व्यसन असलेल्या सुनीलची प्रकृती कारागृहात खालावल्याने त्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याच दरम्यान, सुनील जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या पत्नीने धाव घेतली. त्याची प्रकृती चिंताजनक होती. मुक्ताईनगर पोलिसांनी आपल्या पतीला बेकायदेशीर अटक करून मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. याच दरम्यान सुनीलचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे प्रकरण चिघळले.