जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नियम न पाळणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जळगाव पोलीस दल तसेच महापालिका प्रशासनाने धडक पाऊल उचलले आहे. रात्रीच्या वेळी 9 वाजेनंतर कारण नसतांना घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट केली जात आहे. जळगावात मंगळवारी रात्रीपासून या कारवाईला सुरुवात झाली.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची रस्त्यावरच सरप्राईज अँटिजेन टेस्ट कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची सक्तीने केली जाते अँटिजेन टेस्ट
जळगाव शहरातील प्रमुख चौकांमध्ये ही कारवाई केली जात आहे. आकाशवाणी चौक, तसेच काव्यरत्नावली चौकात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत या कारवाईला एकाचवेळी सुरुवात झाली. रात्री कोणत्याही प्रकारचे ठोस कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना अडवून, त्यांची सक्तीने कोरोनाची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांची तातडीने महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर ज्या नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, त्यांना कडक शब्दांत समज देऊन घरी सोडण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत असताना नियम न पाळणारे नागरिक डोकेदुखी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेंनी केले.
हेही वाचा -आज सायंकाळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक