जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क न्यूज अँकर म्हणून न्यूज स्टुडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी दिली. ऐकून धक्का बसला ना, पण हे अगदी खरं आहे. सुप्रिया सुळेंनी जळगाव दौऱ्यावर असताना शुक्रवारी येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील 'सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लँग्वेज' विभागाला भेट दिली. यावेळी व्हिडिओ स्टुडिओची रचना समजून घेताना त्यांना न्यूज अँकर म्हणून बातमी देण्याचा मोह आवरता आला नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मास मीडिया विभागाच्या व्हिडिओ स्टुडिओची संपूर्ण रचना समजून घेतली. त्यांनी न्यूज अँकरचे काम कसे असते, न्यूज अँकर टेलिप्रॉम्प्टरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा, असे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांशी निगडित शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली.