जळगाव -जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, धरणगाव तालुक्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, वादळामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरे व गोठ्यांवरील पत्रे उडाले.
मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी 3 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. भडगाव, पाचोरा या तालुक्यांत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. धरणगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्येदेखील वादळी पाऊस झाला. जळगाव शहरात सायंकाळी 5 वाजेनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही वेळ जोराचा वारा वाहत होता. मात्र, पाऊस बरसला नाही. भडगाव तालुक्यात तासभर वादळी पाऊस झाला. वादळामुळे या तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजांचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.