जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारात एका हॉटेलच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या विदेशी दारू व बिअरची विक्री करणाऱ्यावर मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून ६४ हजारांची विदेशी दारू व बिअर जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक केली असून, त्याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३७७ विदेशी दारूच्या व बिअरच्या बाटल्या जप्त
याबाबत माहिती अशी, की मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना बहाळ ते चाळीसगाव रस्त्यावरील बहाळ शिवारातील हॉटेल गिरणा पार्कच्या बाजूला विनापरवाना विदेशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हेमंत शिंदे, हवालदार मिलिंद शिंदे, अरुण पाटील, जालमसिंग पाटील, प्रतापसिंग मथुरे, गोरख चकोर, हनमंत वाघोरे, सिद्धांत शिसादे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता, सुनील देसले (वय ३२, रा. सावदे, ता. भडगाव) हा दारू विकताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून एकूण ६४ हजार १९० रुपये किमतीच्या ३७७ विदेशी दारूच्या व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, कारवाईची माहिती आरोपीला मिळून तो सावध होऊ नये, यासाठी पोलीस पथकाने आपले वाहन हॉटेलपासून काही अंतरावर उभे केले. रात्रीच्या अंधारात अचानक जाऊन मुद्देमालासह आरोपीला अटक केली. याप्रकरणी हनुमंत वाघेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील देसले (रा. सावदे, ता. भडगाव) याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.