जळगाव -पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आज (मंगळवारी) जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला थेट रक्ताने सह्या केलेले निवेदन दिले.
जळगावातील शेतकऱ्यांचे प्रशासनाला रक्ताने लिहिलेले निवेदन, वाचा काय आहे प्रकार
पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आज जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला थेट रक्ताने सह्या केलेले निवेदन दिले.
farmers of Jalgaon
दीड ते दोन महिन्यांपासून पावसाची दडी -
जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अशा परिस्थितीत तिबार पेरणी करूनही खरीप हंगामातील पिके जळून गेली असून, आता हाती काहीही लागणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकार आणि महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रक्ताने सह्या केलेले निवेदन आज महसूल प्रशासनाला सादर केले.
काय आहे शेतकऱ्यांची मागणी?
पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी तसेच उडीद, मूग आणि सोयाबीन यासारखी पिके करपली आहेत. आता पाऊस आला तरी पिकांना काहीही फायदा होणार नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पूरग्रस्त नागरिकांना ज्याप्रमाणे मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही मदतीचे पॅकेज द्यावे. थकीत वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, अशा मागण्या निवेदनात शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
नायब तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त-
दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन द्यायला शेतकरी आले. परंतु, तहसीलदार कार्यालयात उपस्थित नव्हते. तेव्हा शेतकरी नायब तहसीलदारांकडे गेले. निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार यांनी दिरंगाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तहसीलदार हजर नसल्याने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. मात्र, त्यांनी आधी अभ्यागतांसोबत चहापान केले. नंतर निवेदन स्वीकारले, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले होते.