जळगाव - शेतकर्यांना आधुनिक शेतीचे तंत्र व प्रयोगशील कृषी व्यवस्थेची विविधांगी पद्धतीने गाथा सांगणाऱ्या 'अॅग्रोवर्ल्ड'च्या राज्यस्तरीय कृषी, दुग्ध व पशू प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 4 एकरावर मांडणी, प्रात्यक्षिकांवर भर, धान्य महोत्सव ही प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये असल्याने जळगावात जणू काही कृषी पंढरीच अवतरली आहे.
शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन प्रणाली, उती संवर्धन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. शेतकर्यांना शासकीय योजनांच्या माहितीसह बँकांची कर्ज प्रक्रिया, पशुपालकांसाठी हिरव्या चार्याचे व्यवस्थापन तसेच दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर ठरणार्या मुरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अॅझोलाची प्रात्यक्षिकाचीही मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलिहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, शेततळ्यातील मोती संवर्धन, गांडूळ शेती अशा बाबी देखील प्रदर्शनस्थळी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची ओळख होण्यास या प्रदर्शनाचा लाभ तर होतोच; शिवाय शेतकरी, कृषी निविष्ठा उत्पादित करणाऱ्या कंपन्या आणि शासनाच्या विविध विभागांचा एकमेकांशी समन्वय साधण्यास देखील हातभार लागतो.
हेही वाचा -'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'