जळगाव- शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात पाणी येणाचा मुख्य स्रोत अंबरझरा तलाव आहे. अंबरझरा तलावाच्या चारीत झाडे, झुडपे वाढल्याने आणि जागोजागी गाळ असल्याने अडथळा निर्माण झाला होता. मराठी प्रतिष्ठानतर्फे तलावाच्या चारी सफाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली.
मेहरूण तलावात पाणी येण्याचा अंबरझरा तलाव हा नैसर्गिक स्त्रोत आहे. गेल्या काही वर्षात अंबरझरा तलावाच्या चारीत झुडपे वाढल्याने आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनी ये-जा करण्यासाठी चारीत कच्चे रस्ते केल्याने जागोजागी पाणी अडत होते. परिणामी मेहरुण तलावात पाणी पोहचू शकत नव्हते. जळगावातील मराठी प्रतिष्ठानतर्फे अंबरझरा तलावाची चारी साफसफाई मोहीम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. रविवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते जेसीबीला नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, मतीन पटेल आदी उपस्थित होते.