जळगाव - यावल आगारातील एसटी चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देत आर्थिक विवंचनेतून या कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. माझ्या मृत्यूला माझा परिवार जबाबदार नसून मी स्वतः आत्महत्या करत आहे, असे पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. यावल आगारात चालक पदावर असलेले शिवाजी पंडीत पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या संपात सहभागी होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी ते जळगाव आगारातील संप ठिकाणी आले होते. मी खूप टेन्शनमध्ये असून मला 20 रुपये द्यावे, अशी विनंती देखील त्यांनी इतर कर्मचाऱ्यांकडे केली होती. मात्र शिवाजी पाटील हे आत्महत्या करतील असे कर्मचाऱ्यांना वाटले नव्हते.
जळगावात एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या सरकारच्या अल्टिमेटममुळे आत्महत्या - शिवाजी पाटील हे यावल येथे पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते यावल आगारात चालक म्हणून नोकरीला होते. गेल्या पाच माहिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शिवाजी पाटील हे देखील सहभागी होते. आज या संपाला पाच महिने झाले. परंतू कोणत्याही मागण्या मान्य झाले नसल्याने संप सुरूच आहे. त्यामुळे पगार देखील बंद आहे. या संकटात शिवाजी पाटील देखील सापडले आहे. त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन किंवा दुसरा जोडधंदा नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य झाल्या असत्या तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नसत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटममुळे जावयाने तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप शिवाजी पाटील यांचे सासरे गोपाळ बारी यांनी केला आहे.
बहिणीला सांगितली व्यथा - २४ मार्च ला शहरातील जुने जळगावातील बहिण लता आणि मेहूणे देवराम पितांबर बारी यांच्याकडे आले होते. दोन तीन दिवस त्यांच्याकडे राहिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे बहिणीला बोलून दाखविले. त्यामुळे बहिणीने परिस्थिती लक्षात घेवून भावाला तांदूळ, मुलांसाठी कपडे आणि काही सोबत पैसे दिले. हा सामान घेवून ते रविवारी २७ मार्च रोजी यावल येथे घरी गेले. त्यानंतर सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता बाहेरगावी जावून येतो असे सांगून घरातुन निघून गेले. माझे वडील खूप विवंचनेत होते. आता तरी आम्हाला शासनाने मदत करावी अशीच रास्त अपेक्षा असा शिवाजी पाटील यांच्या मुलाने व्यक्त केली.
धावत्या रेल्वेखाली आत्महत्या - शिवाजी पाटील यांनी खिश्यात सुसाईट नोट लिहून ठेवत जळगावात आले. शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ १०.३० वाजेच्या सुमारास डाऊन लाईनच्या रेल्वेरूळावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये, “माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद” असे म्हटले आहे. मात्र अजून हे प्रशासन किती बळी घेणार, आमच्या मागण्या मान्य करणार की नाही. विलीनीकरण होणार की नाही, या सरकारला जाग कधी येणार असा सवाल एसटी कर्मचारी करीत आहे.
रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या आमदारांसमोर रोष - जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे यांनी नातेवाईकांचे सांत्वन केले. याप्रसंगी संतप्त झालेल्या एसटी महिला कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांनी आमदारांना 300 घर सरकारने दिली. आम्हाला घराच्या बाहेर काढण्याची नोटीस सरकार देत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आमदारांसमोर मांडीत आक्रोश केला. तर आमच्या मागण्या नेमक्या कधी पूर्ण होणार, सरकार यावर तोडगा कधी काढणार हे तर वेळ ठरवेल.