जळगाव -एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनीही आज (7 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजल्यापासून संप पुकारल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
शेकडो बसेस थांबल्या जागेवर
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारी 12 वाजेपासून संप पुकारला. त्यामुळे शेकडो एसटी बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गाचे हाल होत आहेत. जळगावातून जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या तसेच परजिल्ह्यातून जळगावात येणारी बससेवा ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आगारातच अडकून पडले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काहींनी वाढीव भाडे देत नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घेतला. तर काही प्रवाशांना मात्र आगारातच थांबून राहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
अन्यथा कुटुंबीयांसोबत रस्त्यावर उतरू; एसटी कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा
संपावर उतरलेले एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'आज फक्त एसटी बसेस बंद आहेत. राज्य शासनाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू', असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे.