जळगाव -जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, याकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानकाच्या आवारात बुधवारी घोषणा देत आंदोलन केले. वेतन न मिळाल्यास त्यांनी उपोषणाला बसू, असा इशारा दिला आहे. थकीत वेतनाच्या मागणीचे निवेदन आंदोलनानंतर विभाग नियंत्रकांना देण्यात आले.
विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे, की जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे पगार न मिळाल्यामुळे कुटुंबांचे हाल होत आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन करण्यात यावे. यापूर्वी देखील दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने बुधवारी आंदोलन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनी टाळेबंदी काळात 33 टक्केनुसार सोपविलेले कर्तव्य पार पाडले आहे. कर्मचाऱ्यांना पोटासाठी मोलमजुरी देखील करावी लागत आहे. अनेक जण उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकत आहेत, काही जण शेतात मजुरी करत आहेत. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन थकीत पगारासंदर्भात मागणी करुनही लक्ष दिले जात नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कमी आहेत. पण ते देखील रखडल्याने कर्मचारी संकटात सापडले आहेत.