जळगाव -राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारातील एका एसटी वाहकाने कोरोनाच्या लढाईसाठी आपला महिनाभराचा (25 हजार) पगार पंतप्रधान मदत निधीत जमा केला आहे. मनोज सोनवणे असे या वाहकाचे नाव आहे. एसटीच्या वाहकाने दाखवलेल्या या उदारतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
'समाजाचे आपण काही देणे लागतो', या भावनेतून त्यांनी स्वयंप्रेरणेने हा निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी नागरिकांनी आपल्याला शक्य ती मदत केंद्र आणि राज्य सरकारला करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत मनोज यांनी आपला महिनाभराचा पगार पीएम फंडासाठी देऊन कोरोनाच्या लढाईत खारीचा वाटा उचलला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मनोज सोनवणे यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेशी संपर्क साधला. स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, शाखा व्यवस्थापक बी. आर. धनजे यांना पीएम फंडाच्या मदतीचा 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. सूर्यवंशी आणि धनजे यांनी धनादेशचा स्वीकार करून सदर रक्कम पंतप्रधान मदत निधीत जमा केली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आर. के. पाटील, गोपाळ पाटील, विनोद शितोळे, मनोहर मिस्त्री, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रवासी जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे. एसटीने देखील आम्हाला नेहमीच 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय', हा संदेश शिकवला असल्याने ही रक्कम मदत म्हणून देताना मला आनंद होत आहे, अशी भावना सोनवणे यांनी व्यक्त केली.