जळगाव -गेली 40 वर्षे सक्रिय राजकारणाचा अनुभव असताना साडेचार वर्षात वारंवार भाजप नेत्यांनी आपल्यावर घोर अन्याय केल्याच्या भावनेतून उद्विग्न असलेले माजी मंत्री तथा खान्देशातील भाजपचे वजनदार व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता ते आपल्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषद सदस्यत्व तसेच ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे निश्चित मानले जात आहे. खडसेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास ते जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरदेखील दावा करण्याची शक्यता आहे. अशा वेळी सध्याचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अन्य जिल्ह्यात पालकमंत्रीपदी पुनर्वसन केले जाऊ शकते. खडसेंच्या रुपाने लवकरच जळगाव जिल्ह्यात दुसरा 'लाल दिवा' येणार आहे.
खडसे यांचे राजकीय महत्त्व ओळखून त्यांना स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास इच्छुक होते. त्यातूनच अखेर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होत आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर खान्देशसह राज्यातील अनेक भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, आजी-माजी आमदार, खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात खडसेंनी राष्ट्रवादीतल्या अनेक बड्या नेत्यांची आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणून त्यांना 'सळो की पळो' करून सोडले. हे सगळेच नेतेमंडळी खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाने अस्वस्थ असतील, यात शंका नाही. कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून तत्कालीन मंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवातील स्थानिक नेत्यांना खडसेंनी शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांची नावे घेता येतील. मात्र, मोठ्या साहेबांचीच इच्छा असल्याने आज याच नेत्यांना खडसे राष्ट्रवादीत येत असल्याने त्यांचा पक्षाला मोठा फायदा होईल, हे नाईलाजाने सांगावे लागत आहे. मात्र, याच नेत्यांचे कालांतराने पक्षात महत्व कमी होईल की काय? याचीही त्यांना भीती आहेच.
- खडसेंना पक्षात घेण्यामागे शरद पवारांचे बेरजेचे राजकारण
एकनाथ खडसेंना पक्षात घेण्यामागे शरद पवारांचे निश्चितच बेरजेचे राजकारण आहे. त्यामुळे खडसे यांना जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, पर्यायाने महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा पवारांचा हेतू असू शकतो. राज्यातील विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्ट्रसह मुंबई उपनगरांत असलेल्या काही ठराविक मतदारसंघात खडसेंचा बऱ्यापैकी प्रभाव राहिला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी यापुढे खडसेंकडे दिली जाऊ शकते. या मतदारसंघात खडसेंना मानणारा एक मोठा वर्ग असून तो नेहमीच खडसेंच्या पाठीशी उभा देखील राहिलेला आहे. त्याचप्रमाणे खडसेंना राष्ट्रवादीत घेऊन अधूनमधून शरद पवारांना राजकीय धक्के देणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष अंकुश ठेवण्याचा पवारांचा प्रयत्न असू शकतो, असेही बोलले जात आहे.
- राजकारणापलीकडे मैत्रीचा होणार फायदा
खडसेंना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे, याचा फायदा देखील राष्ट्रवादीला होणार आहे. खडसे यांचा वरकरणी प्रवास जनसंघ, भाजपा असा असला तरी खडसे मात्र मूळ काँग्रेसी आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत त्यांनी काही वर्षे काम केलेले आहे. नंतर मात्र दोघांत वैचारिक मतभेद झाल्याने खडसे त्यांच्यापासून वेगळे झाले. खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेतेमंडळी मित्र आहेत आणि आजही त्यांच्यात राजकारणापलीकडे मैत्री कायम आहे. त्यामुळे याचा फायदा खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर तेथील नेत्यांशी जुळवून घेताना त्यांना होणार आहे. किंबहुना खडसेंच्या इशाऱ्याने या नेत्यांना चालावे लागेल हे विसरता कामा नये.
- खडसेंच्या माध्यमातून पक्षाला गतवैभव मिळवण्याचे पवारांचे प्रयत्न
एकनाथ खडसेंना पक्षात घेण्यामागे पवारांचा राजकीय दुरदृष्टिकोन असणे स्वाभाविक आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या काही वर्षांत उत्तर महाराष्ट्रासह काही जिल्ह्यात पुरती वाताहत झालेली आहे. याला मुख्य कारण म्हणजे, नेत्यांमध्ये असलेली गटबाजी हे आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड पिछेहाट सर्वत्र झालेली आहे. एकेकाळी जिल्ह्याजिल्ह्यात पाच ते सहा संख्यने असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमालीची घटली आहे. उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव जाणवत असल्याने अनेकांनी अन्य पक्षात पक्षांतर केले आहे. या व अन्य कारणांनी गेल्या दहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अक्षरशः उतरती कळा लागली आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीला आक्रमक तसेच बहुजन ओबीसी चेहऱ्याची गरज आहे. दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढणारे खडसे हे सध्याच्या घडीचे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाला गतवैभव मिळवण्याचे पवारांचे प्रयत्न आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसने हेरली उत्तम संधी
एकीकडे खडसेंचा भाजपच्या नेत्यांच्या विरोधात असलेला संताप तर दुसरीकडे त्यांच्याकडे गेल्या साडेचार वर्षात भाजपने त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष ही उत्तम संधी राष्ट्रवादी काँग्रेसने हेरली आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांचा 'फायर ब्रँड' नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या चलाखीने उपयोग करून घेऊ शकते. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी खडसेंचा पक्षप्रवेश निश्चितच फायद्याचा ठरणार आहे.
- भाजपविरोधात दंड थोपटण्यासाठी खडसे ठरतील मोठे अस्त्र
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे संयुक्त सरकार असल्याने नजीकच्या काळात भाजप हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर एक क्रमांकाचा राजकीय शत्रू ठरणार आहे. त्यामुळे भाजपविरोधात दंड थोपटण्यासाठी सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकनाथ खडसे हे एक मोठे अस्त्र समजले जात आहे. खडसे हे मुरब्बी राजकारणी, आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यातच गेल्या चार वर्षात आपल्यावर भाजपने केलेल्या अन्यायाचा पाढा ते वाचत आलेले आहेत. वेळोवेळी त्यांनी ही खंत जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखविली आहे. त्यामुळे निश्चितच खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होताच भविष्यात भाजपविरोधात टीकेची मोहीम उघडतील. त्याचा फायदा आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यातील निवडणुकांमध्ये होणार असल्याचे मानले जाते.
- आतापर्यंतच्या वाटचालीत खडसे आणि राष्ट्रवादी
एकनाथ खडसेंच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच त्यांचे आरोपांचे मुख्य लक्ष्य राहिले आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभा सभापती दिवंगत मधुकरराव चौधरी आणि खडसे यांच्यात राजकीय वैर होते. साकेगाव येथील फार्मसी कॉलेजच्या मालकीच्या वादात खुद्द खडसेंनी उडी घेत दिवंगत बाळासाहेब चौधरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण पोलीस व नंतर न्यायालयाच्या दारात पोहचले होते. त्यानंतर त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांच्या विरोधात खडसेंनी आरोपांची एक मोहीम जणू उघडली होती. नंतर पालकमंत्री असताना डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर या नेत्यांनाही खडसेंच्या कार्यपद्धतीचा उत्तम अनुभव आहे. जुने मतभेद विसरून राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांना आता खडसेंसोबत एकदिलाने पक्षाच्या हितासाठी काम करावे लागणार आहे.
- खडसेंनी का केला 'जय श्रीराम'
- 2014 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याची संधी असताना खडसे यांना डावलले गेले.
- 2016 मध्ये विविध आरोपांनी घेरलेल्या खडसेंना पक्षाने राजीनामा द्यायला लावला.
- आरोप सिद्ध झाले नसताना खडसे यांचे मंत्रिमंडळ वापसीचे दोर फडणवीसांनी कापले.
- आपण निर्दोष आहोत, यासाठी केंद्रीय नेत्यांकडे गेलेल्या खडसेंना टाळण्यात आले.
- खडसे निर्दोष आहेत, हे फडणवीसांनी विधिमंडळ सभागृहात सांगण्याचे टाळले.
- 2019 च्या निवडणुकीत खडसेंचा उमेदवारीचा पत्ता कापण्यात आला.
- अखेरच्या क्षणी कन्येला तिकीट दिले. पण, भाजपच्याच लोकांनी कन्येला पाडले.
- राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पुनर्वसन करण्याचे आश्वासन भाजपने पाळले नाही.
- या सगळ्यामागे फडणवीस असल्याने खडसेंकडून थेट त्यांच्यावर आरोप.
- खडसेंवर भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचा फडणवीसांकडून पुनरुच्चार.
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांच्या जागी सून रक्षा खडसे यांना तिकीट देणे.
- विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचे आपणच दावेदार.
- फडणवीस मुख्यमंत्री झाल्यांनतर कारभारात ढवळाढवळ केल्याचा आरोप.
- रा.स्व.संघाच्या मुख्यालयाशी त्रोटक संपर्क असल्याचा आरोप.
- राजीनामा दिल्यानंतर सातत्याने स्वकियांवर केलेली आगपाखड.
हेही वाचा -खडसेंचा भाजप सोडण्याचा निर्णय दुर्दैवी, पक्षाचे नुकसान होईल, पण ते क्षणिक- गिरीश महाजन