जळगाव- अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची पाल्ये आहेत. त्यामुळे या शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, कुलगुरुंकडे निवेदनाद्वारे मागणी - शैक्षणिक फी माफ करा
अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी कुलगुरुंकडे केली आहे.
![शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, कुलगुरुंकडे निवेदनाद्वारे मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4989187-thumbnail-3x2-jal.jpg)
चालू वर्षी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. शेतीतून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क कशी भरावे? हा प्रश्न पडला आहे. शैक्षणिक शुल्क भरले नाही तर शेतकरी पाल्यांच्या शिक्षणात खंड पडून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफ केल्यामुळे ते शैक्षणिक प्रवाहात टिकतील. आज संपूर्ण देशाच्या पालन पोषणाची बरीचशी जबाबदारी बळीराजाच्या खांद्यावर असताना हा बळीराजाच संकटात असेल तर प्रत्येक क्षेत्रातून मदत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, क्रीडा शिक्षक व हरितसेना प्रमुख प्रवीण पाटील, सुरेश बोरनारकर, दिनेश पाटील आदींनी कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्याशी चर्चा करताना केली.
दरम्यान, या प्रश्नासंदर्भात शासन नियमावलीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांनी चर्चेसाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी काही विद्यार्थीही उपस्थित होते.