जळगाव - धावत्या रेल्वेच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर पडून एक साडेतीन वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भादली रेल्वे स्टेशनजवळ घडली. विनायक शिवकुमार गुप्ता (रा. बोरीवली, मुंबई) असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे. रेल्वे प्रवासात विनायकने आईकडे शीतपेय घेऊन देण्याचा आग्रह धरला होता. शीतपेय घेण्यासाठी आई पर्समधून पैसे काढायला उठताच तो आपत्कालीन खिडकीतून बाहेर पडला. या घटनेत त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला असून, डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.
मुंबई परिसरातील बोरिवली येथे शिवकुमार गुप्ता हे पत्नी पिंकी व मुलगा विनायक यांच्यासह वास्तव्यास आहे. पिंकी गुप्ता यांच्या भावाचा 16 तारखेला उत्तरप्रदेशातील मूळ गावी कटहरी हिराकत (जि. जौनपूर) येथे लग्नसमारंभ होता. या लग्नसमारंभासाठी पिंकी विनायक यांच्यासह गेल्या होत्या. लग्नसोहळा आटोपून भाऊ सुरज गुप्ता याच्यासोबत त्या पुन्हा बोरिवलीकडे जाण्यासाठी मंडू आहीह ते छत्रपती लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये बसल्या होत्या. रेल्वेने भुसावळ स्टेशन सोडले. यादरम्यान गाडीत विनायकने पिण्यासाठी शीतपेय मागितले. ते घेवून देण्यासाठी विनायकला आपत्कालीन खिडकीजवळ उभा सोडून आई पिंकी उठली. पर्समधून पैसे काढत असतानाच उघड्या खिडकीतून विनायक बाहेर पडला. त्यानंतर पिंकी यांनी आरडाओरड करत एकच हंबरडा फोडला. हा प्रकार लक्षात आल्यावर इतर प्रवाशांनी तत्काळ चैन ओढून गाडी थांबवली. पिंकी भाऊ सुरजसोबत गाडीखाली उतरल्या. विनायक पडल्या दिशेने धावत सुटल्या. गंभीर जखमी झाल्याने विनायक बेशुद्ध पडला होता. जळगाव स्टेशनवर रेल्वे पोहचण्यापूर्वी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. त्यानुसार गाडी स्टेशनवर पोहचताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राकेश पांण्डेय, पोलीस शिपाई अजय मून यांनी जखमी बालकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले.