जळगाव - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती अपेक्षेपेक्षा संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्ह्यात अवघे 55 टक्के लसीकरण झाले आहे. आतापर्यंत जेवढे लसीकरण झाले आहे; त्यात सर्वाधिक 70 टक्के लसीकरण हे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना झाले आहे. उर्वरित 30 टक्के लसीकरणात फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने आता 1 मार्चपासून सर्वसामान्य लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात याबाबत सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्त्वे आलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लसीकरणाबाबत संभ्रम आहे.
डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी 16 जानेवारीला झाला होता लसीकरणाचा श्रीगणेशा- कोरोना लसीला केंद्र सरकारने मान्यता प्रदान केल्यानंतर देशभरात एकाच वेळी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही 16 जानेवारीला कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी आरोग्य क्षेत्रातील 22 हजार 318 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 हजार 630 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील नोंदणी केलेल्या 70 टक्के कर्मचाऱ्यांना लस मिळाली. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांपैकी 3 हजार 617 जणांना दुसरा डोस देण्यात आला असून, त्याची टक्केवारी 16.02 टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 21 केंद्रांवर कोरोनाचे लसीकरण सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
फ्रंटलाईन वर्कर्समध्ये पोलीस प्रशासन लस घेण्यात आघाडीवर-
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये पोलीस प्रशासन लस घेण्यात आघाडीवर आहे. पोलीस प्रशासनातील 5 हजार 333 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 3 हजार 547 जणांनी लस घेतली.
अशी आहेइतर विभागांच्या लसीकरणाची स्थिती-
जळगाव जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी सोडून इतर विभागातील सुमारे 18 हजार 729 जणांची लसीकरणासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 6 हजार 554 जणांना लस देण्यात आली असून, त्याची टक्केवारी 35.02 टक्के इतकी आहे. यात पोलीस प्रशासन आघाडीवर आहे. तसेच हौसिंग अँड अर्बन अफेअर्स (4 हजार 627 जणांपैकी 1 हजार 112 जणांना लसीकरण), महसूल विभाग (3 हजार 264 जणांपैकी 1 हजार 435 जणांना लसीकरण), पीआरए मेंबर्स (4 हजार 935 जणांपैकी 374 जणांना लसीकरण), रेल्वे पोलीस बल (370 जणांपैकी 126 जणांना लसीकरण), अशी लसीकरणाची स्थिती आहे.
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण-
पहिल्या डोसचे लाभार्थी- 23 हजार 208
दुसऱ्या डोसचे लाभार्थी- 3 हजार 952
सर्वसामान्यांच्या लसीकरणाबाबत संभ्रम-
केंद्र सरकारच्या वतीने 1 मार्चपासून सर्वसामान्य लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयात कोरोनाची लस देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात याबाबत केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्त्वे आलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लसीकरणाबाबत संभ्रम आहे.
यासंदर्भात बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, सर्वसामान्यांना लस देण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. हे लसीकरण कसे करावे, लसींचे किती डोस उपलब्ध होतील, किती केंद्र लसीकरणासाठी असावेत, याची माहिती आम्हाला मिळालेली नाही, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. सर्वसामान्य लोकांना लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य असेल, अशी शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 42 ते 44 लाखांच्या घरात आहे. त्यात सुमारे 5 ते 6 लाख ज्येष्ठ नागरिक असतील. अशा परिस्थितीत कोरोना लसीचे किती डोस उपलब्ध होतील, याची माहिती नाही. शिवाय कोणत्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था असेल, याचेही नियोजन झालेले नाही. जिल्ह्यातील एकूण ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येपैकी को-मॉर्बिड लोकांना लसीकरणातून वगळावे लागेल. याबाबत देखील नियोजन नसल्याने जळगाव जिल्ह्यात 1 मार्चपासून सर्वसामान्यांना लस मिळणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
हेही वाचा-'भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात... आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला', सचिनचे 'माय मराठी'बद्दल ट्विट